Aaditya Thackeray Patrakar Parishad: गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वाद चालू असल्याचं दिसून येत आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती आणि ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना केलं होतं. या वक्तव्यावरून भाजपाकडून आणि मनसेकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेही राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमद्ये सहभागी झाले होते. यावरूनही भाजपाकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात होतं. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये हिंगोलीतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद चालू आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. काँग्रेसच्या विरोधात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. तसेच, त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली होती, असं राहुल गांधी म्हणाले होते. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपा आणि मनसेकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींवर टीका होत असताना आदित्य ठाकरेंनी भारत जोडो यात्रेमध्ये उपस्थिती लावल्यामुळे तेही टीकेच्या केंद्रस्थानी आले होते.

पाहा व्हिडीओ –

“राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!

दरम्यान, या सर्व वादावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी आजच्या स्थितीवरही भांडण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे. आपण सगळे ५० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार?” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते संजय राऊत?

दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली होती. “उद्धव ठाकरेंनीही याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आम्हा सगळ्यांच्याच मनात प्रचंड आदर आणि प्रेमाची भावना आहे. त्यामुळे राहुल गांधींनी यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यावर हा मुद्दा नसताना मध्येच सावरकरांचा विषय कुठून आला?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात आज आदित्य ठाकरेंनीही त्यांची भूमिका मांडली आहे.