महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर आणि पर्यायाने राज्यभरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शेतजमिनीच्या कथिक घोटाळ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘बॉम्ब फोडणार’ म्हणत राजकीय गौप्यस्फोटाबाबत विधान केल्यानंतर त्यारव प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आमच्याकडेही भरपूर बॉम्ब आहेत” म्हटल्यामुळे एकूणच राजकीय घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून थेट देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
गायरान जमीन प्रकरणावरून विरोधकांनी रान उठवलं आहे. त्यात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा दिला असताना फडणवीसांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं. “कुठलंही प्रकरण काढायचं, त्यावर गोंधळ घालायचा आणि उत्तर घ्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय. आतापर्यंत तरी हे जे बॉम्ब-बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाकेदेखील नाहीत असंच दिसतंय. आमच्याजवळही भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू. पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. “मला वाटतं की त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या द्यायची गरज नाही एवढंच मी सांगतो. ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी आहेत”, असं ते म्हणाले. तसेच, गायरान जमिनीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीकास्र सोडलं. “भ्रष्टाचारी मंत्री डोळ्यांसमोर हे सगळं करत आहेत. धडधडीत पुरावे दिसत आहेत. त्यांना ५० हजारांचा दंडही बसला आहे. अजून कोणता पुरावा हवाय सरकारला?” असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
कर्नाटकच्या भूमिकेवरूनही केलं लक्ष्य
यावेळी अंबादास दानवेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटककडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर टीका करताना राज्य सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. “इतका उशीर का करत आहेत? कर्नाटक रोज महाराष्ट्रावर हल्ला करत आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली पाहिजे. पण हे प्रतिक्रिया देतच नाहीयेत”, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
