मनसेतील नाराज नेते वसंत गिते यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते सक्रीय झाले असून, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी सकाळी गिते यांची भेट घेतली. गिते यांनी अद्याप मनसे सोडून इतर कोणत्या पक्षात जाणार का, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मनसे सोडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर, मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देत पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. गिते यांच्यासह मनसेचे २० ते २५ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सोमवारी होती. दुसरीकडे शिवसेनेनेही आपल्या या जुन्या सहकाऱ्यास खेचण्यासाठी तयारी चालवली आहे. मंगळवारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला आणखी जोर आला. दरम्यान, गिते हे पक्षातच राहणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी त्यांच्या राजीनामा नाटय़ामुळे महापालिकेत पक्षात उभी फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला करण्यात गिते यांची महत्वपूर्ण भूमिका होती. राज ठाकरे सेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना सर्वप्रथम साथ देणाऱ्या बडय़ा नेत्यांमध्ये गिते यांचा समावेश होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही जागा मनसेने खिशात टाकल्या. त्यानंतर सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आणले.
महापालिकेत सत्ता संपादन केली. नाशिकमध्ये कोणताही निर्णय घेताना गितेंचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. यामुळे गिते समर्थकांची सर्वत्र चलती झाली. परंतु महापालिकेत सत्ता मिळूनही कामे होत नसल्याची ओरड सुरू झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व गिते यांच्यातील संबंधात फरक पडण्यास सुरूवात झाली. त्यातच मुंबईहून आलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेत भाग घेणे सुरू केल्यावर गिते यांची नाराजी लपून राहिली नाही.