भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील लाऊडस्पीकरवरील अजान बंद झाले पाहिजेत अशी पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाईल आहेत त्यामुळे आता अजानची गरज नाही अशी भूमिका लाड यांनी मांडली आहे. तसेच आम्ही हे अजान बंद करुन राहणारच असं सांगताना केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. याच भूमिकेवर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिलीय.
शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजपाच्या या अजानबंदीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलीय. “भारतीय जनता पार्टीचे नेते प्रसाद लाड यांचा व्हिडीओ बाईट मी ऐकलाय. खरं म्हणजे अजान एक प्रार्थना आहे. आता ती नुसतीच की लाऊडस्पीकरवर हा विषय आहे,” असं मनिषा कायंदे यांनी म्हटलंय.
उत्तर प्रदेशात निवडणुका असताना का मुद्दा काढला नाही?
“पुढे बोलताना कायंदे यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळेस हा मुद्दा का काढण्यात आला नाही असा प्रश्न भाजापाला विचारलाय. “मला सांगा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या. तिथे मशिदी नाहीत का? मग तिकडे मशिदींवर लाऊड स्पीकर्स नाहीत का? त्यांच्या निवडणुकांच्या आगोदर हा विषय तुम्हाला का सुचला नाही?,” असे प्रश्न कायंदे यांनी उपस्थित केले आहेत.
दंगली घडवण्याचा हेतू…
“आता हे सगळे विषय मुद्दाम हिंदू-मुस्लीम दंगे व्हावेत यासाठी आहेत. जे सगळे एकोप्याने राहतायत त्यात कुठेतरी दंगे व्हावेत त्या दंग्यांचा फायदा भारतीय जनता पार्टीला व्हावा. हाच यामागील हेतू आहे,” असा आरोपही कायंदे यांनी केलाय.
धर्माचा अभ्यास केलाय का?
“एखाद्या धर्माबद्दल तुम्ही बोलतायत. त्या धर्माचा तुम्ही अभ्यास केलाय का? नेमका त्या धर्माच्या काही अनिष्ठ रुढी असतील त्यावर तुम्ही बोलू शकता. पण तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का? तुम्ही कोणत्या अधिकार वाणीने हे सगळं बोलता?,” असंही कायंदे यांनी विचारलंय. पुढे बोलताना, “राहिला विषय लाऊडस्पीकरचा तर त्याबद्दल न्यायालयाचे निकाल आहेत,” असंही त्या म्हणाल्यात.
फडणवीसांकडे गृहखातं होतं तेव्हा…
तसेच, “जेव्हा देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते. गृहखातं त्यांच्याकडे पाच वर्ष होतं. तेव्हा त्यांना हे सगळं सुचलं नाही. मग आताच महाविकास आघाडी सरकार असताना मुद्दाम दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जातेय,” असंही कायंदे यांनी म्हटलंय.