scorecardresearch

“भाजपाचे अनेक महाभाग आज उघडपणे…”; अमृता फडणवीसांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानानंतर संजय राऊतांची टीका

अमृता फडणवीस यांचे विधान त्यांच्या पक्षाला तरी मान्य आहे का? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

“भाजपाचे अनेक महाभाग आज उघडपणे…”; अमृता फडणवीसांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानानंतर संजय राऊतांची टीका
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. नागपुरात अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात बोलताना त्यांनी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, या विधानानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच अमृता फडणवीस यांचे विधान त्यांच्या पक्षाला तरी मान्य आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

हेही वाचा – “…तर अजित पवार मुख्यमंत्री असते”, अजित पवार उपस्थित असलेल्या मंचावरून भाजपा आमदाराचं विधान

“त्यांच्या विधानाला भाजपाचे समर्थन आहे का?”

“अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची मते त्या मांडत असतात. एक नागरिक म्हणून त्यांना आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला आदर असायला हवा, पण महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी देशाच्या जनतेने दिली. मग फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“महात्मा गांधी हेच खरे राष्ट्रपिता”

“महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे जनक होते. मानवतेच्या प्रेमाखेरीज त्यांच्या हृदयात दुसरा कधी विचारच शिवला नाही. प्रेमाचा आणि शांतीचा प्रकाश विश्वावर टाकणारे ते एक महान दीपस्तंभ असल्याचे इतिहासात म्हटले गेले. स्वराज्याचे बीजारोपण गांधींनी केले व देशातील सामान्य जनतेला त्यांनी लढण्यासाठी बळ दिले. त्यामुळे महात्मा गांधी हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रपिताच होते”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तर मग ‘त्या’ १०० खोक्यांचीही SIT चौकशीची मागणी करा” संजय राऊतांना प्रतापराव जाधवांचा टोला!

“…म्हणून भाजपाला काँग्रेस नेत्यांची चोरी करावी लागते”

“भारतीय जनता पक्षातील अनेक महाभाग उघडपणे म्हणतात, ‘देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर म्हणजे पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर मिळाले. त्यामुळे २०१४ नंतर एक नवा भारत निर्माण झाला व त्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत. २०२४ नंतर राज्यशकट बदलले तर नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्याच्या पदवीचे काय करायचे? भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची प्रेरणादायी प्रतीके नाहीत. त्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस या मूळच्या काँग्रेस लढवय्यांची त्यांना चोरी करावी लागते. डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी हा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा हाणून पाडण्यात आला”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – धर्मांतराचा आरोप करत नाताळच्या कार्यक्रमावर ३० युवकांचा हल्ला; चर्चच्या प्रमुखासह सहा जणांना अटक

भाजपावर खोचक टीका

स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कुत्रेही मेले नाही. तुम्ही आमच्या बलिदानावर काय बोलणार? असा जळजळीत प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला विचारला होता. हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत आहे. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले, मग नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता? अशी खोचक टीकाही भाजपावर केली.

“… तर ती इतिहासाशी बेइमानी ठरेल”

स्वातंत्र्यलढ्याशी कोणताही संबंध नसलेली पिढी आज देशावर राज्य करत आहे. जुना इतिहास पुसून त्यांना स्वातंत्र्यलढ्य़ाचा नवा इतिहास लिहायचा आहे. हे असे करणे म्हणजे इतिहासाशी बेइमानी ठरेल. नवा इतिहास रचण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण जुना पुसून त्यावर आपले नाव कोरणे सर्वस्वी चूक. खरगे यांचे कुत्र्यासंबंधीचे विधान भाजपाला त्यासाठी झोंबले. स्वतःचा इतिहास नसला की दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करण्याची धडपड सुरू होते. हा एक प्रकारचा न्यूनगंडच असतो. ज्या काळात, ज्या लढ्यात आपण कधीच नव्हतो, तो काळ पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वातंत्र्य लढ्याची प्रतीके व प्रतिमा उद्ध्वस्त होताना दिसत आहे. नवे राष्ट्रपिता, नवे सरदार, नवे पंडित, नवे मौलाना, नवे नेताजी, नवे हिंदुहृदयसम्राट, नवी शिवसेना, नवी काँग्रेस निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. हे सर्व का व कशासाठी? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 08:58 IST

संबंधित बातम्या