scorecardresearch

“सरकारमधील ह**** स्वत:ला हरिश्चंद्राचे…”; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शिवसेनेचं शिंदे सरकारवर टीकास्र

पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा देतात. मात्र, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

“सरकारमधील ह**** स्वत:ला हरिश्चंद्राचे…”; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शिवसेनेचं शिंदे सरकारवर टीकास्र
फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भष्टाचाराचे आरोप केलेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीकास्र सोडण्यात आले आहे. पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा देतात. मात्र, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसले आहेत, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंना ठाण्याबाहेर कुणी ओळखत होतं का? – अरविंद सावंतांचा बोचरा प्रश्न

शिवसनेने नेमकं काय म्हटलंय?

“पंजाब सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री फौजासिंग सरारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते ठेकेदारांकडून वसुली करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर आणली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तत्काळ मंत्री फौजासिंग यांचा राजीनामा घेतला व चौकशीचे आदेश दिले. हा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर घेतला गेला. पण ही अशी नैतिकता आपल्या महाराष्ट्रात तोळाभर तरी शिल्लक आहे काय? मुळात महाराष्ट्रात एक सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवर आले व ते रोज अनैतिक कामे करत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली; पण ते सर्व मंत्री आजही निर्लज्जासारखे आपल्या खुर्च्यांना चिकटून बसले आहेत”, अशी टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली आहे.

“हे काय नैतिकतेस धरून आहे?”

“मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘एनआयटी’तील 16 भूखंडांचे प्रकरण बाहेर आले. गरीबांच्या घरांसाठी ठेवलेले भूखंड हायकोर्टाचे निर्देश डावलून परस्पर बिल्डरांना विकले. 110 कोटींचे भूखंड दोन कोटींना बिल्डरांच्या हाती ठेवल्याची जी महाराष्ट्र सेवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्यावर हायकोर्टाने ताशेरे मारले. पण मुख्यमंत्री म्हणतात, ‘तो मी नव्हेच.’ मंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनी नियमबाह्य पद्धतीने विकल्या. याच सत्तारांनी त्यांच्या गावातील सिल्लोड महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना 10 कोटी रुपये जमविण्याचे टार्गेट दिले. हे काय नैतिकतेस धरून आहे?” अशा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला.

हेही वाचा – मोठी बातमी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही; बच्चू कडूंचं सूचक विधान

“यंत्रणांचे बोलविते धनी आता कोठे आहेत?”

यावरून शिवसेनेने भाजपा नेते किरीट सोमैयांनाही लक्ष्य केलं. “माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचा आरोप ठेवून त्यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा व त्या यंत्रणांचे बोलविते धनी आता कोठे आहेत? सत्तार, शिंद्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन किरीट सोमय्या वगैरे लोक आता ईडी कार्यालयात, न्यायालयात का गेले नाहीत? ‘‘शिंदे, सत्तार ‘हिशेब’ तर द्यावाच लागेल,’’ असे ते का गरजले नाहीत? हे धोरण संशयास्पद नाही काय? अनिल परब यांचे रिसॉर्ट वगैरे काही नसताना ते रिसॉर्ट तोडण्यासाठी हातोडे नाचविणारे हेच लोक मंत्री शंभू देसाईंच्या महाबळेश्वरच्या बेकायदा बांधकामाकडे डोळेझाक करतात. संजय राठोडांचेही गायरान जमिनीचेच प्रकरण विरोधकांनी समोर आणले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोगस-बनावट डिग्री घेतल्याचा घोटाळा समोर येऊनही सरकारमधील ह**** स्वतःस हरिश्चंद्राचे अवतार मानून मंत्रालयात बसले आहेत”, अशी टीका शिवसेनेनेकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे नैतिकतेचे धडे अधूनमधून देत असतात; पण ती नैतिकता महाराष्ट्रात कणभरही झिरपलेली दिसत नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 07:51 IST

संबंधित बातम्या