अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकारणात नव्या वादानं डोकं वर काढलं होतं. या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतनं थेट राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंचंही नाव घेत आरोप केले होते. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. कंगनाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. दहा तोंडांचा रावण. अनेक तोंड आहेत. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. पाकव्याप्त काश्मीर? मला आठवत २०१४मध्ये मोदी म्हणाले होते की, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार… पाकव्याप्त राहू द्या. भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटते, त्यांना म्हणावं, अनधिकृत सोडून द्या. ३७० कलम काढलेलं आहे. अधिकृत १ इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, ही असली रावणी औलाद. महाराष्ट्रात जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. मुंबई पोलीस हे जणू काही निकम्मे आहेत. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे काही मध्ये सगळं झालं, जणू काही महाराष्ट्रात शिवाजी पार्क असेल इकडे तिकडे गांजाची शेतीच फुललेली आहे. असं हे चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. असं चित्र निर्माण करायचं. त्यांना माहिती नाहीये अजून महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या संस्कृतीत आमच्या घराघरामध्ये तुळशीची वृंदावन आहेत, गांजाची नाही,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या अभिनेत्री कंगना रणौतचा समाचार घेतला.
आणखी वाचा- राज्यपालांना टोला लगावत उद्धव ठाकरेंचं बिहारच्या मतदारांना आवाहन; म्हणाले…
“एकाने आत्महत्या केली, लगेच तो बिहारचा पुत्र झाला! त्याने आत्महत्या केली, त्यात काही काळंबेरं असेल तर माझ्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते ही शोधूनही काढलं असतं. पण लगेच बिहारचा पुत्र म्हणून गळे काढले गेले आणि महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागले? महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदेश, ठाकरे कुटुंबीय, आदित्यवर चिखलफेक केली गेली. तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावर टाकल्या. पण काय झालं? आता तेच शेण आणि गोमुत्राने भरलेलं तोंड, याचा आवंडा गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा, अशा शब्दांत उद्धव यांनी पलटवार केला. “तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत, पापी वृत्तीची माणसं आम्ही नाही,” असेही ते म्हणाले.
आणखी वाचा- एक बेडूक… भाडोत्री बाप ते रावणी औलाद; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ
“देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर तुम्ही महाराष्ट्रापासून तोडूच शकत नाहीत. कारण शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिला आहे, जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही. जो काही कारभार आम्ही करत आहोत, तो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने करत आहोत. पण भारतीय जनता पक्षाचे काय? भाजप जे काही करत आहे, भाजप नेते ज्या पद्धतीने वागत आहेत त्यांनी निदान ज्या मातीत जन्मले तिच्याशी तरी इमान ठेवावे. आम्ही जर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर फटाके नका वाजवू पण निदान खोटं तरी बोलू नका,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले.