शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदेंसोबत आधी सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे राजकीय परिस्थिती तणावपूर्ण झालेली असतानाच शिवसेनेचे अजून तीन आमदार आणि एक अपक्ष आमदार शिंदे गटासोबत गेल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे नवे तर्क सुरू झाले आहेत.

४२ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी?

एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट उद्धव ठाकरेंना घातल्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. आधी एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्ष आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये आज सकाळी शिवसेना आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि दीपक केसरकर हे आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३४ झाली असून इतर ८ अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या आता ४२पर्यंत गेल्याचं समोर येत आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढली; आणखी ३ आमदार गुवाहाटीमध्ये दाखल

दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यामुळे नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच ज्येष्ठ शिवसेना नेते अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण राजकीय घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “वेट अँड वॉच. तुम्ही थोडी वाट पाहा. सगळं ठीक होईल. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चालेल”, असं अनिल देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं राज्यात काय घडणार आहे? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंची नवी ऑफर!

जवळपास ४२ आमदार पाठिशी असणाऱ्या एकनाथ शिंदेंना आता उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये देखील त्यांनी “शिवसैनिकाकडेच मुख्यमंत्रीपद जाणार असेल तर मला आवडेल”, असा उल्लेख केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची ही ऑफर एकनाथ शिंदे स्वीकराणार की नाकारणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.