गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि विशेषत: मुंबईच्या राजकीय वर्तुळात याकूब मेमनच्या कबरीवर केलेल्या कथित सुशोभीकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. भाजपा आणि शिवसेना हे काम नेमकं कुणाच्या कार्यकाळात झालं, यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे या कब्रिस्तानची जबाबदारी असलेल्या ट्रस्टने सुशोभीकरण झालंच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत एका बैठकीत असल्याचा हा व्हिडीओ आहे. यावरून भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं असताना किशोरी पेडणेकर मात्र चांगल्याच संतापल्या आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेते मोहीत कंबोज यांच्यावर थेट टीकास्र सोडलं आहे.

भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणावरून थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत आरोप केले आहेत. “दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं पाहिजे, याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण का केलं? त्याच्या मागे नेमका काय उद्देश होता? फेसबुक लाईव्ह आणि ट्विटरच्या माध्यमातून ते खूप उत्तर देतात. याचं उत्तरही जनता त्यांना विचारत आहे,” असं आव्हानच कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

“राज्यपाल, फडणवीसही रऊफ मेमनला भेटले”

दरम्यान, या पार्श्वभूमीवर रऊफ मेमनसोबत आलेल्या त्या व्हिडीओमुळे किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या. “मी कधीही इतक्या मोठ्या राजकारणात गेली नाही. मी कब्रिस्तानाला भेट दिली नव्हती. मी सगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. त्यात हेही एक धार्मिक स्थळ होतं. राज पुरोहिताचा मुलगा आकाश पुरोहित हा देखील होता. तिथल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करायला आम्ही गेलो होतो. राज्यपाल देखील रऊफ मेमनला भेटले. याला काय म्हणणार? देवेंद्र फडणवीसही त्यांना भेटले. त्याला काय म्हणणार? जे बदनामीचं षडयंत्र तुम्ही करत आहात, त्या चिखलात तुम्हीच पडणार आहात”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Video : “तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं?

मोहीत कंबोज यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं. “प्रत्येक गोष्ट उद्धव ठाकरेंपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे बारा भोंगे करत आहेत? मोहीत कंबोज, तू असशील पैसेवाला. पण तो तुझ्या घरात. फालतुगिरी करणं बंद कर”, असा दमच किशोरी पेडणेकरांनी मोहीत कंबोज यांना भरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“..मग तुम्ही पंतप्रधानांचा अपमान करताय का?”

“मोहीत कंबोज ज्या पद्धतीने आज बोलतायत. अर्थातच कंबोज यांची राजकीय नाही, तर इतरही कारकीर्द सगळ्यांना माहिती आहे. याआधीही सण सगळेच साजरे झाले, फक्त गर्दी नव्हती.जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान यांनीच तसे निर्देश दिले होते. तुम्ही मग पंतप्रधानांचा अपमान करत आहात का? पंतप्रधान जे सांगत होते, तेच उद्धव ठाकरेंनी केलं. पण ते कारण ठेवतायत झाकून आणि नको ते बघतायत वाकून. लोकांना माहिती आहे की आता तुम्हाला कसं वाकवायचं”, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.