लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी झडत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत हे शरद पवारांचे पंटर असल्याचा टोला लगावला आहे.
मंत्री दादा भुसे काय म्हणाले?
“शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज उद्या (२२ एप्रिल) भरायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत. आम्ही पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्राधान्य दिले. मात्र, उमेदवारी घोषित होण्यासाठी थोडासा उशिर झाला ही वस्तुस्थिती आहे”, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा : विनायक राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले, “फूस झालेली लवंगी फटाके…”
दादा भुसे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अनेक चांगले काम केले आहे. या सर्व गोष्टी पाहाता महायुतीचे काही ठिकाणचे उमेदवार घोषित होण्यासाठी उशीर झाला. मात्र, महायुतीचे महाराष्ट्रातील ४५ प्लसचे मिशन आम्ही यशस्वी करु”, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांवर निशाणा
मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे म्हणणे आहे. मी अनेकदा सभागृहामध्येही बोललो की, संजय राऊत हे शरद पवार यांचे पंटर आहेत. ते भाकरी खातात शिवसेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची”, असा खोचक टोला दादा भुसे यांनी लगावला.