शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिर्डी याठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

धर्मवीर चित्रपट आणि महाराष्ट्रातील राजकारण याबाबत प्रश्न विचारला असता, केदार दिघे म्हणाले की, “धर्मवीर हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. दिघेसाहेब हे केवळ तीन-चार जणांमध्येच वावरले नाहीत. केवळ त्यांच्याच आयुष्यात काहीतरी बदल घडावा, म्हणून त्यांनी काम केलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दिघेसाहेबांचे असंख्य चाहते आहेत. दिघेसाहेबांमुळे किंवा त्यांनी केवळ जवळ घेतल्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला आहे.”

हेही वाचा- “ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा…” केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“त्यामुळे मी तेव्हादेखील बोललो होतो आणि आताही बोलत आहे की, दिघेसाहेबांचा चित्रपट हा केवळ तीन तासांचा असू शकत नाही. त्यांचा जीवनपट रेखाटायचा असेल तर ‘सीरीज ऑफ इव्हेंट’ करावे लागतील. मला वाटतं ते सत्यात असावेत. अनेकजणांनी खऱ्या अर्थाने दिघेसाहेबांच्या आयुष्यात मोठा नसेल, पण खारीचा वाटा म्हणून काम केलं आहे. साहेबांबरोबर ते राहिलेले आहेत. या सर्वांची विचारधारा एकत्र करून साहेबांचा जीवनपट बनवला पाहिजे” असंही केदार दिघे म्हणाले.

हेही वाचा- केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना म्हटलं की, उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत, यासाठी मी साईबाबा चरणी प्रार्थना केली आहे. उद्धव ठाकरेंनी ठाणे जिल्ह्याच्या प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. मीही आनंद दिघे साहेबांप्रमाणे काम करून दाखवीन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.