माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (८ जानेवारी) पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांच्या एकत्र प्रवासावरुन महाराष्ट्रात खमंग चर्चा सुरु आहे. अनेकांनी या घटनेवर आपापले मत नोंदविले आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील या घटनेवर मत व्यक्त केले आहे. “शरद पवार राज्याचेच नव्हे तर देशाचे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. हे कटुता संपविण्याचे पहिले पाऊल असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांच्यासोबत फार काळ कटुता ठेऊ शकत नाही.”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हे ही वाचा >> शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस, नव्या राजकारणाची नांदी आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटतं…”

“महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे आणि ती संपविण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी मी त्या वक्तव्याचे स्वागत केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी टोकाची कटुता, द्वेष, सुडाचे राजकारण हे मागच्या ६०-६५ वर्षात कधीही पाहिले गेले नाही. राजकीय मतभेत हे होतच असतात. पण ज्यापद्धतीचे राजकारण महाराष्ट्रत होत आहे, ही आपली परंपरा नाही. सत्तांतरे होत असताना इतक्या टोकाची कटुता कधी पाहिली नाही. फडणवीस कटूता संपविण्याचे नेतृत्व करत असतील तर महाराष्ट्र नक्कीच त्यांचे स्वागत करेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जी विषाची उकळी फुटली आहे, ती संपुष्टात आली पाहीजे.”, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा >> “शरद पवार मोठे नेते, पण…”, ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

घटनाबाह्य सरकारवर घटनेचा हातोडा पडणार

केंद्र आणि राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार असल्याबाबतचे प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, मंत्रिमंडळात बदल करणे हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. अनेकदा मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे किंवा त्यांचा परफॉर्मेन्स शून्य असेल तर त्यांना मंत्रिमंडळातून काढलं जातं. कुणालातरी राजकारणात संधी द्यायची असेल तर मंत्रिमंडळातून काढलं जातं. मंत्रिमंडलात फेरबदल झाले तरी तेच पत्ते पिसले जातील. महाराष्ट्रातील सरकार मात्र घटनाबाह्य आहे. लवकरच घटनेचा हातोडा या घटनाबाह्य सरकारवर पडेल.

रविवारी पुणे येथे दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पुण्यात पार पडला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पवार आणि फडणवीस हे एकाच गाडीतून आले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात याची खमंग चर्चा सुरु झाली आहे.