शिवसेनेची ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तोफ म्हणून सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदार आणि नेते यांच्यावर टीका करत असतात. आता सुषमा अंधारेंना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारेंपासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त गटात प्रवेश करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे आणि शिंदे गटातील आमदार यांच्यात सतत शाब्दिक चकमक उडत आहे. त्यातच सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे आज ( १३ नोव्हेंबर ) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तसेच, वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा : अफजल खानाच्या कबरीशेजारी तिसरी कबर कोणाची? उत्तर देत संभाजी ब्रिगेडचा मोठा दावा, म्हणाले…

“वाघमारेंच्या प्रवेशाने माझे खच्चीकरण…”

“वैजनाथ वाघमारे आणि मी गेली चार-पाच वर्षे विभक्त राहत आहोत. व्यक्तिस्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. वाघमारेंच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. वाघमारेंच्या प्रवेशाने माझे खच्चीकरण होणार नाही. मी माझं वेगळं आयुष्य जगत आहे,” असे स्पष्टीकरण सुषमा अंधारेंनी दिलं आहे.

“भविष्यात आरोप-प्रत्यारोप…”

“वाघमारेंच्या प्रवेशाने माझ्या आयुष्यावर परिणाम होईल, असं का मानावे. मी त्यांना मित्र किंवा हितचिंतक समजत नसल्याने शत्रूही मानत नाही. भविष्यात आरोप-प्रत्यारोप होतील, ते व्यक्तिगत अथवा कौटुंबिक पातळीवर न आणता राजकीय विषयावर असावे,” असेही सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : “शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयीच शंका निर्माण केली, त्यांना मदत…”, जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्या दोघांना पाच वर्षांची मुलगी”

वैजनाथ वाघमारेंनी तुमचा पर्दाफाश करणार आहेत, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, “त्यांच्याकडे काही असेल याची माहिती मला नाही. महिला म्हणून रडत बसणारी नसून, मी लढणारी स्त्री आहे. माझं आयुष्य खुली किताब आहे. आमच्या दोघांना पाच वर्षांची मुलगी असून, तिचं नाव कबीरा सुषमा अंधारे आहे,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं.