Sanjay Shirsat Retirement : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी आज एक मोठं विधान केलं आहे. ‘आता थांबलं पाहिजे’, असं म्हणत थेट राजकीय निवृत्तीचे संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच आपण १० वर्ष नगरसेवक आणि २० वर्ष आमदार आहे, त्यामुळे आता कुठेतरी थांबायला पाहिजे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले?
“मी अल्पसंतुष्ट असा व्यक्ती आहे. हे पाहिजे किंवा ते पाहिजे अशी मला कधीही इच्छा नव्हती आणि नाही. १० वर्ष मी नगरसेवक होतो, २० वर्ष मी आमदार आहे. ज्याचं कधी स्वप्न पाहिलं नाही ते सर्व पदे आपण भोगले आहेत. अखेरला काही काळानंतर माणसाचं वय थांबायला भाग पाडतं. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. कधीतरी मध्येच थांबायचं का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये काल आला”, असं मंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
“दररोजची धावपळ करण्यापेक्षा थांबायचं का? त्यामुळे मी मनाशी असं ठरवायचा प्रयत्न करतोय की आता थांबलं पाहिजे. मग यासाठी कोणाचा राजकीय दबाव किंवा कोणी काही बोललं किंवा कोणाच्या वैतागाने मी असं बोलतोय अशा काहीही भाग नाही”, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“आज माझं ६४ वय आहे. मग स्वप्न पाहायचे म्हटल्यावर आपण काही स्वप्न पाहू शकतो. आता माझ्याकडे २०२९ पर्यंतचा वेळ आहे. २०२९ पर्यंत मी ६९ वर्षांचा होईल. मग वयाच्या ७० व्या वर्षी काय करायचं? याचा विचार तर केला पाहिजे ना. भविष्यात राजकारण हा जनतेच्या सेवेच्या संधीचा भाग जरी असला तरी आता माझ्याकडे असलेलं खातं चांगलं आहे, मी चांगलं काम करत आहे. त्यामुळे आणखी मला काहीतरी पाहिजे किंवा माझ्या अजून काही अपेक्षा आहेत, असं काही नाही. जे आहे, त्यात मी समाधानी आहे”, असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे.
