शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. एकनाथ शिंदें यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याची कारणे सांगितली आहेत. यातील बऱ्याच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेवर गंभीर आरोप केले आहेत. सातारा कोरेगाव येथील शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत आक्रमक भूमिका घेण्याचे कारण सांगितले आहे. “वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आम्ही सर्व शिवसेना आमदार एकत्र होतो. त्या बैठकीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी आम्हाला मतदारसंघासाठी किती पैसे दिले याचे आकडे मागितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर चुकीचे आकडे दिले. त्यांनी दिलेले आकडे आणि आम्ही सांगितलेले आकडे पाहून मुख्यमंत्री सुद्धा अचंबित झाले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. पण त्यामध्ये काही बदल झाला नाही,” असे महेश शिंदे यांनी म्हटले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवू नये यासाठी…”; बंडखोर आमदार योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

“शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटी तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ७०० कोटी निधी देण्यात आला होता. आम्ही पराभव केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही आमच्यापेक्षा जास्त निधी उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आला होता. त्यांना निधीही दिला जात होता आणि आम्हाला कुठल्याही कार्यक्रमांना बोलवले जात नव्हते. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की यामध्ये सुधारण करण्यात येईल. बऱ्याच गोष्टींना त्यांनी स्थगिती दिली पण उपमुख्यमंत्र्यांनी ते ऐकले नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीला केराची टोपली दाखवून उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये विरोधकांची विकासकामे केली. अशा पद्धतीचे काम सातत्याने चालू राहिले,” असे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे.

“माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा…”; एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे माझ्या मतदारसंघात आले आणि त्यांनी जाहीर केले की पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना दाखवत होतो. तेही सातत्याने तळमळीने सांगत होते की या गोष्टी थांबतील. पण कुठलीही गोष्ट थांबली नाही. अशा परिस्थितीमध्ये काम करणे आम्हाला अशक्य होते. राष्ट्रवादीकडून मला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हा पक्ष करत होता. त्या रागामुळे आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत,” असे आमदार महेश शिंदे म्हणाले.