गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. या काळामध्ये किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर अनेकदा आरोप केले. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर किरीट सोमय्यांनी सातत्याने टीका केल्यानंतर त्यावर प्रताप सरनाईक चांगलेच भडकले आहेत. किरीट सोमय्यांनी आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी अशी भूमिका प्रताप सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र, यातलं काहीच झालं नसल्यामुळे आता प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सरनाईकांची चौकशी

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात भाजपानं प्रताप सरनाईक, अनिल परब, अनिल देशमुख यांच्याविरोधात जोरदार टीका सुरू केली होती. त्यामध्ये किरीट सोमय्या आघाडीवर होते. सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेमुळे त्रस्त झालेल्या प्रताप सरनाईक यांनी आता किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

“प्रताप सरनाईक मातोश्रीवर लपले”

काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक आणि शिवसेनेवर खोचक टीका केली होती. “१०० दिवस झाले असून प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे”, असं किरीट सोमय्या म्हणाले होते. “कोविड काळात या मतदारसंघात हजारो लोक करोनाग्रस्त झाले असून आमदारांचा पत्ता नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचं काम करत आहेत याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचं असल्याचं देखील ते म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.