काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा गंभीर प्रकार घडला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यावर तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्याचा निषेध केला होता. मात्र, या प्रकरणी अद्याप कर्नाटक सरकारकडून संबंधितांवर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. संसदेमध्ये या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळच देण्यात आला नसल्याची तक्रार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं महाराष्ट्राची प्रतिक्रिया येण्याआधी मराठी माणसाची गळचेपी थांबवा, असा इशारा दिला आहे.

कर्नाटकच्या पोटदुखीलाही पार्श्वभूमी..

दरम्यान, कर्नाटकच्या या पोटदुखीला देखील एक पार्श्वभूमी असल्याचं अरविंद सावंत एबीपीशी बोलताना म्हणाले. “खूपच वेदनादायक, संतापजनक अशी ही घटना आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. या पोटदुखीलाही पार्श्वभूमी आहे. १ नोव्हेंबरला सतत ते काळा दिवस पाळतात. १६-१७ डिसेंबरला ते धरणं धरतात. सनदशीर मार्गाने तिथली मराठी माणसं गेली ६५ वर्ष लढा देत आहेत”, असं सावंत म्हणाले.

“महाराष्ट्राला प्रतिक्रिया द्यायला लावू नका”

“सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा पडून आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. पण सनदशीर मार्गाने लढणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दळवी यांच्यावर शाई फेकली गेली. पण त्यात कुणावर कारवाई केली गेली नाही. त्यातून त्यांचं धाडस वाढतं. त्यामुळे आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन संकुचित आहे. म्हणून त्या पुतळ्याची विटंबना झाली. आम्हाला महाराष्ट्राला प्रतिक्रिया द्यायला लावू नका अशी माझी विनंती आहे”, असा इशारा अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

कर्नाटकमध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “अजिबात सहन…”

“…हा सावधानीचा इशारा!”

“महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मारझोड सुरू आहे. २०० लोकांवर कारवाई सुरू आहे. एवढं होऊनही ते थांबत नाहीयेत. राज्यसभेत हा विषय मांडण्यात आला आहे. सरकारने अजून गंभीर दखल घ्यावी. मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया येण्यापूर्वी हे सगळं थांबवा, हा सावधानीचा इशारा”, असं सावंत म्हणाले आहेत.