दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सर्वत्र सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. मात्र आता या चित्रपटावरुन जोरदार राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटावरुन भाजपसह मोदी भक्तांना जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द कश्मीर फाइल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले, असे संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“प्रत्येक मोठ्या माणसाचा कमीत कमी एक चमचा असायलाच हवा. भाट, भांड, तोंडपुंजे त्यातूनच निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द कश्मीर फाईल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले. मोदींनी ‘द कश्मीर फाईल्स’चा प्रचार सुरू करताच देशभरातील त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले. ही चमचेगिरीच्या अधःपतनाची हद्द असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.”

“चमचेगिरीचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान मोदी यांना कसे ओढायचे यावर भक्त मंडळीत प्रचंड खल झाला असावा. शेवटी एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर बातम्या झळकल्याच. मोदी यांनी पुतीन व बायडेनशी तब्बल एक तास चर्चा केली. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी फोन करून मोदींकडे मदत मागितली. मोदी यांनी म्हणे पुतीन व बायडेन यांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला. मोदी यांचा सल्ला दोघांनी मानल्याचेही प्रसारित झाले.”

“पण सत्य असे की, पुतीन यांनी युक्रेन पूर्ण बेचिराख केले आहे. पुतीन व बायडेन हे मोदींच्या ऐकण्यातले होते, मग दोघांत युद्ध का पेटले? यावर भक्त व चमच्यांचे म्हणणे असे की, ‘‘युद्धाला तोंड फुटले तेव्हा मोदी हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे त्या दोघांचा मोदींशी संपर्क होऊ शकला नाही!’’ ही सरळ सरळ चमचेगिरी आहे”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

‘द कश्मीर फाइल्स’नंतर विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र विवेक अग्निहोत्रींनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.