Money Laundering Case: शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.

पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायालयाने याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलण्यास सांगितल्याचे समजते.

हेही वाचा- ईडी चौकशीत संजय राऊतांशी भेट झाली का? पत्रकारांच्या प्रश्नावर वर्षा राऊत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार याची माहिती देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून त्यांना स्वतंत्रपणे तुरुंगात ठेवण्यात येईल. राऊत यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. मात्र त्यांना आमदार नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्यासोबत ठेवण्यात येणार नाही. देशमुख हे आधीपासून पीएमएलए प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.