२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का ठरला. मात्र आता पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच २०२४ साठी हा मतदारसंघ शिवसेनेनं पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा यासंदर्भातील मागणीवरुन आतापासून मावळ प्रांतात राजकारण रंगू लागलं आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील दोन मुख्य घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका फेसबुक पोस्टमुळे मावळच्या राजकारणात मतदारसंघ पार्थ यांच्यासाठी सोडण्याची चर्चा रंगली असून यावरुन आता बारणे यांनी राष्ट्रवादीला थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करु नये असं सांगितलं आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून जालन्यामध्ये खासदार बारणे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना बारणे यांना मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यासंदर्भातील मागणीवरुन प्रश्न विचारण्यात आला. “राष्ट्रवादीच्या देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट करु मागणी केलीय की मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडण्यात यावा तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्यात यावं,” असं पोस्टमध्ये म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतना बारणे यांनी, “राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यकर्त्याने पोस्ट टाकली त्याला मी ओळखत नाही. लोकसभेच्या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आहे. अशा पोस्ट टाकून संभ्रामवस्था निर्माण करतात. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांचा बोलवता धनी कोण आहे का? अशा कार्यकर्त्याला पुढं करुन अशा गोष्टींना खतंपाणी घातलं का हे तपासलं पाहिजे,” असं मत व्यक्त केलं.

पुढे बोलताना बारणे यांनी, “या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विश्वास टाकून २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली. मी मतदारसंघामध्ये लोकांचं काम करतोय, हित जोपासतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोपवण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं पाहिजे,” असंही म्हटलं आहे.

मात्र त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा देताना शिवसेनेला डिवचू नये असंही म्हटलंय. “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र काम केलं पाहिजे. पण शिवसेनेला डिवचण्याचं काम जर महाविकासआघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असेल तर शिवसैनिकांकडून पण तसेच उत्तर मिळेल,” असंही बारणे सांगायाला विसरले नाहीत.

तुमच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे म्हणून राष्ट्रवादीकडून कमी निधी मिळतो का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता “राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काम करत आहेत. आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळतो आणि माझ्या मतदारसंघामध्ये काम होत आहे. माझा पक्ष, माझे नेते माझ्यासोबत आहेत. मला दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणं अधिक योग्य वाटत नाही,” असं बारणे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, लोकसभेला तुम्ही पार्थ पवार यांचा पराभव केलेला म्हणून अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जातेय का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता बारणे यांनी थेट राष्ट्रवादीला इशारा दिला. “तुम्ही ते त्यांना म्हणजेच राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे. जे भूमिका घेतात त्यांना विचारला. पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचं काम राष्ट्रवादीने करु नये एवढच मी सांगतो,” असं बारणे म्हणाले.