“जागा घ्यायची तर जीवपण घ्या,” रेल्वे रुळाशेजारील झोपड्यांना नोटीस पाठवल्याने श्रीकांत शिंदे आक्रमक, म्हणाले, “आम्ही गोळी खातो…”

घरांवर कारवाई होऊ देणार नाही; श्रीकांत शिंदेंचा इशारा

Shivsena, Shrikant Shinde, Central Railway
"पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही"

रेल्वेने रुळांलगतच्या झोपडीधारकांना नोटीसा दिल्या आहेत. यानंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून जागा घ्यायची तर जीवदेखील घ्या अशा शब्दांत सुनावलं आहे. पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरासह शेलार नाका, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील नागरिकांची श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली.

रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. यानंतर कल्याण पूर्वचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे नागरिकांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे जोपर्यंत रेल्वे प्रशासन येथील लोकांचे पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत याठिकाणी कारवाई होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला आपल्या जागांवर झालेलं अतिक्रमण आणि ते हटवण्याची आठवण झाली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर रेल्वेने ३० ते ४० वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना नोटीसा बजावल्यात . आधीच करोनामुळे लोकं भयभीत झाली असून या नोटीसमुळे आणखी भीती पसरली आहे. रेल्वेने नोटीस बजावत सांगितले आहे की सात दिवसांत घरं खाली करा. पण हे शक्य आहे का?”. २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या कायद्याने संरक्षित असल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.

“रेल्वेला त्यांची जागा रिकामी करून हवी असेल तर त्यांनी अगोदर पुनर्वसन धोरण तयार केलं पाहिजे. त्याशिवाय इथली घरं रिकामी होणार नाहीत. आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे असून उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला.

“कोणत्याही शासकीय योजनांमध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येकाचे पुनर्वसन केले जाते. त्यानूसार रेल्वेनेही याप्रकरणी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असून केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेने एकत्रितपणे समनव्य साधून हा मुद्दा सोडवणे आवश्यक आहे. रेल्वेच्या नोटिसांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून रेल्वेने त्यांना धीर देणे आवश्यक असल्याची,” भूमिका श्रीकांत शिंदे यांनी मांडली. यावेळी त्यांनी तेथील संपप्त महिलने आम्ही गोळी खाऊ असं म्हटलं असताना धीर देताना तुम्ही कशाला आम्ही आहोत ना गोळ्या खायला असं म्हणाले असंही म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mp shrikant shinde met residents living near railway track who gets notice from central railway to vacant home sgy

Next Story
अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी