भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी कारवाईसंबंधी चर्चा केली होती. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील तपास संस्था निष्पक्षपणे तपास करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल अंसही म्हटलं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत

“आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न

नाट्याला एक परंपरा, पावित्र्य असून त्यात एक सत्यता असते. मराठी नाटकाला प्रतिष्ठा आहे असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जावं –

“किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करु शकत नाही,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. “मोदी, अमित शाह यांच्यावरही आरोप होतात. आरोप करणं सध्या फॅशन झाली आहे, त्यानुसार त्यांनी आरोप करत राहावं,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

कोणता रंग आमचा आहे तो सोमय्यांना लवकरच कळेल.-

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, “कोणता रंग आमचा आहे तो त्यांना लवकरच कळेल. कायदेशीर कारवाई होत असेल तर रंगाचा प्रश्न का येतो? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तिरंगा पाहून कारवाई केली जात नाही. शिवसेनेवर असे आरोप करण्याआधी आपलं अंतरंग झाकून पाहावं हेच मला सांगायचं आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut maharashtra cm uddhav thackeray home ministry bjp kirit somaiya sgy
First published on: 20-09-2021 at 10:59 IST