गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यामध्ये नवनवे दावे आणि आरोप दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र, एकीकडे न्यायालयात ही सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा सेना-भाजपा युती कशी फुटली, यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात केलेल्या दाव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते दानवे?

२०१९ साली भाजपा आणि शिवसेनेची युती कशी फुटली? नेमकं त्या वेळी दोन्ही बाजूंनी कोणता फॉर्म्युला ठरला होता? यासंदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. “उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये बंद दरवाजाआड काय चर्चा झाली, हे नंतर अमित शाह यांनी आम्हाला सांगितलं होतं. ज्यांचे जास्त आमदार निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आपण त्यात काहीच मोडतोड करायची नाही”, असा युतीचा फॉर्म्युला ठरल्याचं दानवे म्हणाले होते.

दरम्यान, दानवेंनी केलेल्या या दाव्यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. वरळीच्या हॉटेल ब्लू सीच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांचं निवेदन जर ऐकलं असेल, तर रावसाहेब दानवे कुठेतरी पाताळात फिरतायत. ते अजून पृथ्वीवर यायचे आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“दानवेंना ती क्लिप हवी असेल, तर…”

“अमित शाह यांच्या संमतीने देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा सांगितलं होतं की शिवसेना-भाजपाचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला ५०-५० टक्क्यांचा आहे. रावसाहेब दानवेंना जर ती क्लिप हवी असेल, तर पाठवतो. कदाचित त्या वेळी पक्षानं त्यांना विश्वासात घेतलं नसेल”, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या बाजूने…!”

संजय राऊतांमुळेच शिवसेनेत फूट? राऊत म्हणतात..

दरम्यान, संजय राऊतांमुळेच शिवसेनेत फूट पडली, या बंडखोर आमदारांच्या दाव्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “२०१४ साली जेव्हा भाजपानं युती तोडली, तेव्हा संजय राऊत त्या चित्रात कुठे होते? २०१९ साली भाजपानं दिलेला शब्द तोडला, तेव्हा संजय राऊत कुठे होते? रावसाहेब दानवे जालन्याचे आज खासदार आहेत. २०२४ ला असतील की नाही या भ्रमिष्ट अवस्थेत ते आहेत. म्हणून त्यांना असे विषय सुचत आहेत”, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut mocks raosaheb danve on 2019 alliance formula pmw
First published on: 20-07-2022 at 14:57 IST