उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गावातील मंदिरात मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालघर घटनेचा उल्लेख करत या घटनेला धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भयानक ! उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंदिरात दोन साधूंची हत्या. मी सर्वांना आवाहन करतो की याला धार्मिक रंग देऊ नये. ज्याप्रकारे काही लोकांनी पालघर प्रकरणात प्रयत्न केला होता”.
भयानक! बुलंदशहर, यूपी के एक मंदिर में दो साधुओं की हत्या, लेकिन मैं सभी से अपील करता हूं कि वे इसे सांप्रदायिक न बनाएं, जिस तरह से कुछ लोगों ने पालघर मामले में करने की कोशिश की।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020
पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने हल्ला करत तिघांची हत्या केली होती. यामधील दोन साधू होते. यानंतर अनेकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असा कोणताही संबंध नसून राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती केली होती. सोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकही मुस्लीम नसल्याचं सांगत चुकीचे आरोप केले जात असल्याचं सांगितलं होतं.
आणखी वाचा- उत्तर प्रदेशात साधूंच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…
बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.
आणखी वाचा- तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व नकली झालंय… संजय राऊतांना टोला
ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला नशा करण्याचं व्यसन आहे. आरोपीने साधूंचा चिमटा चोरला होता. त्यामुळे साधू आरोपीवर रागावले. त्यातूनच आरोपीनं दोन्ही साधूंची सोमवारी तलवारीनं रात्री हत्या केली. आरोपीला घटनास्थळावरून तलवार घेऊन जाताना ग्रामस्थांनी बघितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं. सध्या आरोपी नशेत असून शुद्धीत आल्यानंतर चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
