वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल झाले असून मंदिरं खुली करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन केलं जात आहे. मात्र आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आंदोलनावर टीका केली असून विरोधी प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“मंदिरांना इतक्या महिन्यानंतरही टाळं लागणं हे काही आनंदाने केलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरु करत आहे. भविष्यात लवकरच मंदिरं, रेल्वे सुरु होण्यासंदर्भात चर्चा होईल. विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नियम मोडण्यासाठीच आलो आहोत, आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन

“हे चित्र सकारात्मक आणि चांगलं नाही. पंढरपुरातील दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसला आहे, फक्त जमलेत ते लोक नाहीत. वारकरी संप्रदाय तसंच अनेकांशी आमची चर्चा झाली आहे. मंदिराबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. हजारो लोक जमले आहेत. त्यातून संक्रमण वाढू शकतं. मुख्यमंत्र्यांनी हा धोका ओळखूनच ही परवानगी दिलेली नाही,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

“नेते नियम मोडून आत जाऊ सांगत आहेत. प्रकाश आंबेडकर एक संयमी नेते आहेत. कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून कायदेभंगाची भाषा करणं लोकांना हुसकावण्यासारखं आहे. विरोधक आणि मंत्री एकत्रित मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे,” असं संजय राऊत बोलले आहेत. “लोकांना वेठीस धरु नये. परिस्थती सुधारत असून त्यात तणाव निर्माण होता कामा नये,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, “संजय राऊत यांनी अभ्यास सुरु केला आहे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. सरकार ज्यावेळी काही करत नाही त्यावेळी याच घटनेने जनतेला सरकारला काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार दिला आहे हे त्यांना माहिती नाही,” असा टोला लगावला.