“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

“परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली गेली. ”

sachin vaze
अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार (फाइल फोटो)

“वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करणारी भाजपा उद्या त्याला पक्षात घेऊ शकते, असा टोलाही शिवसेनेनं लागवला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली. यामुळे वाझे हे या खटल्यात आरोपी नव्हे, तर सीबीआयचे साक्षीदार असतील. याच निर्णयावरुन शिवसेनेनं आता भाजपाला लक्ष्य केलं आहे.

हे नीतिमत्तेस धरून नाही
वाझे यांनी विशेष न्यायालय आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून याप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. गेल्याच आठवडय़ात वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सीबीआयने मंजुरी दिली होती. याचसंदर्भात शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपावर टीका केलीय. “शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे म्हणे माफीचा साक्षीदार होणार आहे. राज्यातील विरोधी पक्ष म्हणजे भाजपाने वाझेप्रकरणी केलेला शिमगा विसरता येणार नाही. वाझे म्हणजे ‘वसुली, भ्रष्टाचार’ असे नामाभिधान बनले आहे. वाझे हा भ्रष्टाचार, वसुली, खून अशा प्रकरणातील एक आरोपी आहे. बडतर्फ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा हस्तक म्हणून वाझे पोलीस खात्यात काम करीत होता. परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली गेली. महाराष्ट्राची तर बदनामी झालीच, पण संपूर्ण पोलीस दलास कलंक लागला. अशा वाझेला सीबीआयने राजकीय फायद्या-तोट्यासाठी माफीचा साक्षीदार करावे हे नीतिमत्तेस धरून नाही,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे काय?
“अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवून वाझे याने आधी सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे सूत्रधार वाझे व परमबीर सिंह आहेत. परमबीर सिंह यांना केंद्राने व कोर्टाने या प्रकरणात सरळ सरळ अभय दिले व आता परमबीर सिंह यांचा हस्तक वाझे यालाही माफीचा साक्षीदार केले जात आहे. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप लावला, पण आरोपाला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. तरीही ईडी व सीबीआयने देशमुख यांच्या घरावर दोनशे वेळा धाडी घातल्या. देशमुख आता तुरुंगात आहेत. परमबीर सिंग करूनसवरून मोकळे आहेत व वाझे यालाही अभय मिळत आहे. यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

माफीचा साक्षीदार बनवता येत नाही
“सीबीआयसारखी केंद्रीय संस्था सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवत आहे हा प्रकार साधासरळ नाही. वाझे याने अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवून दहशतवादासारख्या भयंकर कृत्यात सहभाग घेतला. मनसुख हिरेन हा त्याचा जवळचा मित्र असतानाही स्वतःच्या व परमबीर सिंह यांच्या बचावासाठी मनसुखची हत्या घडवली. अशा वाझेला सीबीआय आता माफीचा साक्षीदार बनवत आहे. वाझेवर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. इतक्या भयंकर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवता येत नाही. वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

माफीचा साक्षीदार बनून खरे काय सांगणार?
“या सगळ्या प्रकरणात मेख वेगळीच आहे. मला साफीचा साक्षीदार करा, असा विनंती अर्ज वाझेने केला व हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने वाझेला दिलासा देताना अट काय घातली? माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी देतो, पण सीबीआयला खरे खरे सांगा. आता खरे सांगायचे म्हणजे काय? जो खटला खोटेपणावर उभा आहे, त्यातला सगळ्यात खोटारडा गुन्हेगार आता माफीचा साक्षीदार बनून खरे काय सांगणार? त्यामुळे वाझे हा सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भारतीय जनता पक्षाचा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल,” असा टोला शिवसेनेनं लागवलाय.

भाजपाने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?
“प्रश्न सचिन वाझेचा नसून नैतिकतेचा आहे. आज भारतीय जनता पक्षात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक माफीचे साक्षीदार बनून घुसले आहेत व शांत झोपले आहेत. भाजपामध्ये प्रवेश केल्याने ‘ईडी’चा त्रास वाचला व शांत झोप लागते, हे हर्षवर्धन पाटील यांनीच कबूल केले. नारायण राणे व त्यांच्या पोराबाळांच्या बोगस कंपन्यांचे आर्थिक व्यवहार ‘ईडी’च्या रडारवर येताच हे महाशयही भाजपाचे माफीचे साक्षीदार बनले. बँका बुडवणारे, काळा पैसा पांढरा करणारे अनेक पांढरपेशे गुन्हेगार माफीचे साक्षीदार बनून भाजपावासी झाले. हार्दिक पटेल हा कालपर्यंत भाजपासाठी देशद्रोही होता. आता तोही माफीचा साक्षीदार बनून भाजपामध्ये गेल्याने उद्यापासून देशभक्त म्हणून भाजपाच्या ताम्रपटाचा मानकरी होईल. महाराष्ट्रात तर मंगळसूत्र चोरांच्या टोळीपासून अनेक ‘वाल्या’ शुद्ध-शुचिर्भूत होण्यासाठी माफीचे साक्षीदार बनले व भाजपाने त्यांना पवित्र करून घेतले. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आणि अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करून उद्या त्याला भाजपावासी केले तर आश्चर्य वाटायला नको. माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपाने स्वतंत्र कक्षच उघडला आहे काय?,” असा खोचक टोला शिवसेनेनं लागवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2022 at 08:02 IST
Next Story
निर्बंध नकोत, तर मुखपट्टी वापरा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला शिस्त पाळण्याचे आवाहन
Exit mobile version