मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत हे सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) लक्ष्य ठरले आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां राऊत, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे माजी संचालक प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित ११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर मंगळवारी टाच आणली. या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं ‘सामना’मधून ‘हर हर ईडी, घर घर ईडी’ म्हणत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधलाय. कोल्हापूरमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले असून ती बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. मुख्य लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात होण्याची शक्यता आहे. असं असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना ईडीच्या नावाने धमकावल्याचे आरोप केले जात आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारतीय जनता पक्षाचे डोके सुपीक असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ महाराष्ट्राची मती व माती वांझ आहे असे नाही. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करायचाच असे या मंडळींनी ठरविलेले दिसते. काँग्रेस आमदाराच्या आकस्मिक निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुकीचा जो निकाल लागायचा तो लागेल, पण भाजपाच्या प्रांतिक अध्यक्षांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ धमकावले आहे की, भाजपास मतदान झाले नाही तर तुमच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा लावू. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीदर्शन होईल व ते डिजिटल माध्यमातून होईल, अशी भीती भाजपा पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी राज्यातील संबंधित यंत्रणांना सावध केले पाहिजे,” असा टोला शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

नक्की वाचा >> “मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

“भारतीय जनता पक्ष हा जणू सोवळे नेसूनच राजकारण करीत असल्याने निवडणुकीत पैसे वाटप, दाबदबाव अशा पापकर्मांची त्यांना लाज वाटते, पण निवडणुकीतील लक्ष्मीपूजनाबाबत व लक्ष्मीदर्शनाबाबत भाजपा पुढाऱ्यांची दिलदार वक्तव्ये पाहिल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटते. पाटलांच्या आधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे पैठण येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले व मतदारांना म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या आधी एक दिवस लक्ष्मीदर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा!’’ म्हणजे भाजपाला निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाचे व लक्ष्मीपूजनाचे वावडे नाही. नव्हे, भाजपा नवहिंदुत्व, संस्कृती व परंपरांचा वापर करूनच निवडणुका जिंकत असतो,” असा उपरोधिक टोला शिवसेनेनं लागवला आहे.

नक्की वाचा >> कोल्हापूर पोटनिवडणूक: मोदींच्या नावे लोक BJP ला मतं देतील असा चंद्रकांत पाटलांना विश्वास; म्हणाले, “मोदी माणसांच्या…”

“पाटील यांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमकावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे, ‘‘ईडी म्हणजे भाजपचे घरगडी!’’ हे विधान सत्य करून दाखविणारे वक्तव्य भाजपा प्रांताध्यक्षांनी केले आहे. ऊठसूट ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या द्यायचे हे जे वेड महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांना लागले आहे ते त्यांच्या मानसिक प्रकृतीबाबत चिंता वाटावी असे आहे. अमरावतीचे भाजपा समर्थक आमदार राणा यांनीही तेथील पोलीसप्रमुख आरती सिंह यांना ईडी व सीबीआयच्या माध्यमातून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य मोडायचे, प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे उद्योग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मान्य आहेत काय?,” असा थेट सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> ED ची राऊतांविरोधात कारवाई : निलेश राणे म्हणतात, “राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही…”

“महाराष्ट्रातील भाजपाचे टिनपाट-उपरे रोज उठून ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या नावाने ‘आज याला अटक करू व त्याला अटक करू,’ अशा बतावण्या करतात. त्यामुळे केंद्र सरकारची प्रतिष्ठा मातीमोल होत आहे. आता ही घसरगुंडी इतक्या खालच्या पातळीवर गेली की, थेट मतदारांनाच ‘ईडी’च्या नावाने धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. भारतीय जनता पक्षाचेच बहुधा असे म्हणणे असावे की, ‘‘भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाचा लाभ जरूर घ्या, पण दुसऱ्यांच्या राजकीय सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद घ्याल तर याद राखा, ‘ईडी’च्या फेऱ्यात अडकवू!’’ कोल्हापूर उत्तरेतील हजारो मतदारांवर ‘ईडी’ची चौकशी लावण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना राजाराम तलावासमोर स्वतंत्र कार्यालय थाटावे लागेल असे दिसते,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

नक्की वाचा >> “किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“पंतप्रधान मोदी यांची सगळ्यात जास्त बेइज्जती कोणी करीत आहेत तर ते हे असे बेताल बोलणारे भाजपावालेच. दुसरे असे की, भाजपावाल्यांनी कोल्हापूरच्या मतदारांना असे धमकावण्यापूर्वी त्या मातीचा व माणसांचा इतिहास जाणून घ्यायला हवा होता. कोल्हापूरचा नाद करायचा नाही, अशी परंपरा आहे,” असा सूचक इशारा शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना आणि पर्यायाने भाजपाला दिलाय.

नक्की वाचा >> “२०१९ मध्ये राज्यात सरकार न बनवून शकलेली भाजपा…”; ED ने राऊतांवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

“कोल्हापूरची जनता स्वच्छ अशा पुरोगामी विचारांची आहेच, पण राष्ट्रीय बाण्याचा हिंदुत्ववाद, निर्भयपणा त्यांच्या रक्तात आहे. देशातील सामाजिक, राजकीय क्रांतीच्या ठिणग्या अनेकदा कोल्हापुरातूनच पडल्या. कोल्हापुरातील कुस्तीगीरांनी भल्या भल्यांना अस्मान दाखवले आहे हे काय भाजपाच्या नकली हिंदुत्ववाद्यांना माहीत नसावे? ज्यांना कोल्हापूर कळले नाही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लुडबुड करू नये आणि कोणी अशी करत असेल तर त्यांना कोल्हापूरची मर्दमऱ्हाटी जनता अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

“कोल्हापूरकर कधी काय करतील याचा नेम नाही. मागच्या दिवाळी-पाडव्यास कोल्हापुरातील कसबा-बावडा परिसरात म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. म्हशींचाही ‘फॅशन’ शो हौसेने भरवून आपल्या मनाची श्रीमंती दाखविणाऱ्या कोल्हापूरकरांना भ्रष्ट वगैरे ठरवणे हा करवीरनगरीचा अपमान आहे. कोल्हापूरकर जनतेने ‘ईडी’ची पर्वा न करता आपले राजकारण केले व चंद्रकांतदादांचे पार्सल कोल्हापुरातून कोथरूडला पाठवले. कोल्हापूर ‘उत्तर’ पोटनिवडणुकीत चंद्रकांतदादांनी भाजपाचे उमेदवार म्हणून स्वतः ‘शड्डू’ ठोकायला हरकत नव्हती. ‘ईडी’च्या नावाने आरोळ्या तेव्हाही ठोकता आल्या असत्या, पण तसे का झाले नाही? कोल्हापूरच्या जनतेची ‘ईडी’ चौकशी करण्याची त्यांची योजना चांगली आहे. छान! पाच राज्यांत जेथे जेथे भाजपाचा विजय झाला, त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची ‘ईडी’ चौकशी लावाच. गोव्यातील ‘पणजी’ आणि साखळ मतदारसंघातून सुरुवात करा. म्हणजे सत्य समोर येईल. ‘‘हर हर मोदी, घर घर मोदी’’ या घोषणेस जोडून कोणी ‘‘हर हर ईडी, घर घर ईडी,’’ अशी घोषणा देत असेल तर लोकांना बंड करावेच लागेल,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams chandrakant patil over his ed threat to kolhapur people scsg
First published on: 06-04-2022 at 08:20 IST