महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधानसभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख करत त्यांच्या विधानांवरून टीका केली. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना सुषमा अंधारेंनी त्यावरून फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांचे जुने व्हिडीओ ट्वीट केले असून त्यावरून फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना सुषमा अंधारेंच्या काही विधानांवरून टीका केली. “सुषमा अंधारे म्हणतात की ‘राम-कृष्ण थोतांड आहे. सीतामातेला जो सोडून जातो, तो शबरीसोबत बोरं खात बसतो. या देशातील लोक इतके मेरिटवाले होते, की माकडं पूल बांधत होती’. आमच्या रामाबद्दल असं बोललं जातं तेव्हा अपमान होत नाही का”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“देवेंद्रभाऊ, वादाला तोंड फुटलंच आहे तर..”
यावर सुषमा अंधारेंनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्रभाऊ वादाला तोंड फुटलेच आहे तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. हे भाजपाचे लोक आहेत की परग्रहावरचे? आणि यावर आपलं नेमकं मत काय आहे? बाकी तुम्ही माझ्यावर हल्ला करण्याइतके अस्वस्थ झालेलं बघून आनंद वाटला”, असा टोला अंधारेंनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच या व्हिडीओमध्ये भाजपा खासदार नरेंश अग्रवाल यांनी संसदेत केलेल्या एका वक्तव्याचाही समावेश आहे. “व्हिस्की में विष्णू बसे, रम में श्रीराम, जीन में माता जानकी और ठर्रेम में हनुमान सियावल राम चंद्र की जय”, अशी घोषणाच अग्रवाल देताना या व्हिडीओत दिसत आहेत.