शिवसेनेच्या दोन्ही गटातील ५४ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी तीन आठवडे लांबणीवर गेली आहे. शिंदे गटातील आमदारांनी याचिकेच्या कागदपत्रांची मागणी करुन दोन आठवड्यांचा कालावधी मागितल्यावर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना एक आठवड्यांचा वेळ दिला. त्यानंतर प्रतिज्ञापत्र व त्यास उत्तर सादर करण्यासाठी १० दिवसांचा कालावधीही मंजूर करण्यात आला आहे.

यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. “विधानसभेत सरडे बसले आहेत. अनेक पक्ष त्यांनी बदलले आहेत. त्यामुळे अनेक पक्षांचे रंग त्यांच्या अंगावर आहे. विधानसभा अध्यक्ष असल्याने हवा तसा विलंब करत आहेत,” असा हल्लाबोल अरविंद सावंत राहुल नार्वेकरांवर केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा : “फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…

अरविंद सावंत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतरही बेकायदेशीर सरकार बसलं आहे. देशात लोकशाही आणि संविधानाचा कोण सन्मान राखतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.”

“सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अंमलबजावणी विधानसभा अध्यक्षांनी करायची आहे. पण, विधानसभेत सरडे बसले आहे. अनेक पक्ष त्यांनी बदलले आहेत. अनेक पक्षांचे रंग त्यांच्या अंगावर आहेत. विधानसभा अध्यक्ष असल्याने हवा तसा विलंब करत आहेत,” असं टीकास्र अरविंद सावंत यांनी राहुल नार्वेकरांवर सोडलं.

हेही वाचा : मराठवाड्याला ५९ हजार कोटींची भेट, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणूक आयोगानं शिवसेना चिन्ह आणि नाव काढून घेतले, ते बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगानं आमच्याकडून २० लाख फॉर्म घेतले. समोरच्यांनी किती फॉर्म भरून दिले? याचा आकडाही जगाला कळूद्या. मग पक्ष, नाव आणि चिन्ह त्यांना कसं दिलं? चाळीस आमदार म्हणजे पक्ष नाही. एखाद्या पक्षात एकच आमदार आहे. तो आमदार पक्षातून बाहेर गेल्यावर काय होईल?” असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.