महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात शनिवारी उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे आणि उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडी या ठिकाणी जाणार आहेत. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन या ठिकाणी उद्धव ठाकरे हे उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार होते मात्र इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळी ९.३० वाजता उद्धव ठाकरे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाहून निघतील आणि त्यानंतर नवी मुंबईतल्या योगी हॉटेल या ठिकाणी जातील. तिथून पुढे खालापूर आणि इर्शाळवाडीला पोहचणार आहेत. इर्शाळवाडी गावात दरड कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य हे दोन दिवस सुरु होतं. महाराष्ट्रातली गुरुवारची सकाळ उजाडली ती याच बातमीने. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आणि बचावकार्याचा आढावा घेतला. आता उद्धव ठाकरे हे शनिवारी इर्शाळवाडीला जाऊन तिथल्या गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. मध्यरात्रीनंतर तिथे बचावकार्य सुरू झालं. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असून अजूनही तिथे ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याामुळे आज दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफनं सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत या घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे आहे इर्शाळवाडी?
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे. साधारणपणे ४८ कुटुंबांची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी विधानसभेतील निवेदनात दिली. पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी वसली आहे. मात्र, या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणं अशक्य झालं आहे. दोन तासांची पायपीट करूनच पायथ्यापासून घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य होत आहे.
