एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते राहिलेल्या नारायण राणे यांची भाजपामध्ये गेल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच भाजपाकडून नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यासाठीच नारयण राणेंच्या मागे केंद्रीय मंत्रिपदाची ताकद भाजपानं उभी केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या दाव्यांना फेटाळण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना ग्रामपंचायतही जिंकता आलेली नाही. अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही. भाजपाने कोकणातले पंतप्रधान जरी केले तरी शिवसेना संपणार नाही”, असं सामंत म्हणाले आहेत. कोल्हापुरातील शिवसंपर्क अभियानाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“आम्ही शिंग घेऊन कुणाला मारायला जात नाही”

यावेळी बोलताना उदय सामंत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली. “अंगावर आले कि शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही कोणाकडे शिंग घेऊन मारायला जात नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतीतून उत्तर देत आहेत”, असं सामंत म्हणाले.

राणेपुत्र आणि सेना खासदाराने दिलेली हाळी म्हणजे बोलाचीच कढी..!

विरोधकांचे १२ वाजवल्याशिवाय राहणार नाही!

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी देखील पुन्हा १२ आकड्याची आठवण करून दिली आहे. सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा धसका घेऊन विरोधकांनी शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. पण, शिवसंपर्क अभियानाच्या १२ दिवसांत भगवे वातावरण करून विरोधकांचे १२ वाजविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत”, असं ते म्हणाले.