शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपाने पाडली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबरोबरच भाजपावरही टीकास्त्र सोडलं. तुम्ही माझ्याकडचे कितीही बाण न्या, धनुष्य माझ्याकडेच असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसह भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपावर टीका केली.

उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या रामदास कदमांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; म्हणाले “ही माणसं कधीच…”

उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेनेतील फुटीला बंडखोर आमदार नव्हे, तर भाजपा असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की “भाजपाच शिवसेना संपवत आहे. भाजपा दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूर्ण होईल”.

“तुम्ही कसली हकालपट्टी करता, मीच तुम्हाला…,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका; खदखद मांडताना अश्रू अनावर

उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून, सतर्क राहा अशी सूचना केली. तसंच माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या, पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे आहे असंही म्हटलं.

सुधीर मुनगंटीवार यांची टीका

“कधी रेडे, कधी कोंबडे असतात. कोणी झुंज लावली याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. तुमच्या मनात कोणी खुर्चीचं प्रेम कोणी जागवलं? कोण शकुनी आहे? की चांगल्या युतीत खडा टाकला याचा विचार केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाला कधीच दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावण्याचं काम करावं लागत नाही. भाजपा विचारांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कधी अमित शाह, कधी राजनाथ सिंह यांचं नाव घ्यायचं, गुवाहाटीमधील आमदार संपर्कात असल्याचा दावा करायचा, पण हे सर्व खोटं होतं, आता नवीन अफवा पसरवत आहेत,” असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.