कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”

“गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातोय, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत”

“महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला १०० गावं देऊ’ असंही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहे. उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“पक्षाचे नेते किंवा राज्याचे मुख्यमंत्री, विशेषत: भाजपाच्या अखत्यारीतले, त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू-चालू शकतात का? ते नसेल, तर मग बोम्मई जे काही बोललेत, हे त्यांच्या वरीष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? म्हणजे भाजपाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, उद्योगधंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, अशा शब्दातं उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्र सोडलं.

“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

राज्यपालांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. “असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत.मात्र, राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. राज्यपाल पदाचा मी मान करत आलो आहे, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray slams karnataka cm basavraj bommai on maharashtra border issue pmw
First published on: 24-11-2022 at 17:06 IST