युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर आदित्य ठाकरे यांनी स्वत: आपली उमेदवारी जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू देत असं यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“हा निर्णय माझ्या स्वप्नासाठी नाही तर जनतेसाठी घेतला आहे. आमदार, मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. जनतेचं स्वप्न साकार कऱण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. फक्त निवडणूक नाही तर लोकांच्या न्याय-हक्कांचा लढा लढण्याची हीच वेळ आहे. बेरोजगारी संपवण्याची हीच वेळ आहे,” असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं. “धर्म, जातीपातीचे सगळे भेदभाव संपवत एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याची हीच वेळ,” असल्याचंही ते म्हणाले.

“निवडणूक लढण्याच्या आपल्या निर्णयावर बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात नवं काय घडवायचं असेल तर राजकारण एक चांगला मार्ग आहे. महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर अजून ती कशी करु शकतो याचा विचार करत होतो. नगरसेवक, आमदार यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे असं वाटत होतं,” असं त्यांनी सांगितलं. मला अनेकजण राजकारणातच का गेला असं विचारत असतात, त्यावर मी इतर काहीही करु शकत नाही हे एकच उत्तर माझ्याकडे असतं असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena yuvasena aditya thackeray maharashtra assembly election 2019 sgy
First published on: 30-09-2019 at 17:39 IST