सांगली : मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा ७३ वा संगीत महोत्सव आजपासून (सोमवार) सुरू होत असून, यंदाच्या संगीत महोत्सवात नामांकित कलाकार आपली कला सादर करणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष मधू पाटील मळणगावकर यांनी दिली. दि. २९ पर्यंत चालणाऱ्या संगीत महोत्सवाचे सोमवारी विदुषी कलापिनी कोमकली देवास यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. यावर्षीच्या संगीतसभेत विजय कदम यांचा मराठी गीतांचा कार्यक्रम मंगळवार दि. २३ रोजी सादर केला जाणार असून, याचवेळी संगीतकार राम कदम पुरस्कार प्रियांका बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या वेळच्या संगीत सभेमध्ये संजीवनी हसबनीस यांचे सोलो तबला वादन, सायली तळवळकर यांचे शास्त्रीय गायन, सोहम जगताप व सचिन जगताप यांची बासरी व संतुर वादनाची जुगलबंदी अनिरूछ ऐडम यांचे शास्त्रीय गायन, दुर्गा शर्मा यांचे व्हायोलिन वादन, आदित्य मोडक यांचे गायन, सुजाता गुरव यांचे शास्त्रीय गायन, मिलिंद शैरॉय यांचे बासरी वादन, सुश्मिता डवाळकर यांचे शास्त्रीय गायन, शर्वरी वैद्य यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद फारूक लतिफ खान यांचे सारंगी वादन, तन्मया क्षीरसागर यांचे शास्त्रीय गायन, गरीमा व रिद्धिमा या मुलींची सतारीवर जुगलबंदी, दिपीका वरदराजन यांचे शास्त्रीय गायन, अमित द्रविड, आलापिनी जोशी यांचे शास्त्रीय गायन, श्रेया ताम्हणकर यांचे बासरी वादन, मिता पंडित यांचे गायन आणि दिशा देसाई यांचे कथ्थक आदी कलाकार आपली कला दहा दिवसांच्या संगीत सभेत सादर करणार आहेत. संगीत सभेच्या अखेरच्या सत्रात दि. २९ सप्टेंबर रोजी कौस्तुभ देशपांडे यांचा गीत शिल्प प्रस्तुत आनंद तरंग हा मराठी गीतांचा कार्यक्रम व ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय संगीत सादर होणार आहे, अशी माहिती बाळासाहेब मिरजकर यांनी दिली.