सावंतवाडी : वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवून त्यांना भरमसाठ वीज बिल आकारले जात असल्याच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेसह सर्व पक्षीय ग्राहकांनी आज सावंतवाडीत तीव्र आंदोलन केले. शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. राक्षे यांना घेराव घालून जाब विचारला. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी आणि परवानगीशिवाय बसवलेले मीटर त्वरित काढून टाकावेत, अन्यथा ४ ऑगस्ट रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
सावंतवाडी तालुक्यात सुमारे ४ हजार स्मार्ट मीटर नादुरुस्त ठरवून ग्राहकांना सक्तीने लावण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दुप्पट बिले येत असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असेही आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भुर्दंड लादू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनानंतर उपअभियंता श्री. शैलेश राक्षे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटर त्यांच्या परवानगीशिवाय बदलण्यात आले आहेत, ते पुन्हा पूर्वीप्रमाणे बदलून द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हे मीटर बदलले नाही तर ४ ऑगस्ट रोजी ग्राहक पुन्हा मोर्चा घेऊन येतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निशांत तोरसकर यांनी स्मार्ट मीटरची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच, परवानगीशिवाय बसवलेले सर्व मीटर त्वरित काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी केली. अधिकारी राक्षे यांनी ग्राहकांची बाजू ऐकून घेतली, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. “आम्ही कोणालाही जबरदस्ती केलेली नाही, त्यानी सांगण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश गवंडळकर,निलेश म्हाडगुत, ॲड. ऋग्वेद सावंत, आशिष सुभेदार, इम्तियात विराणी, अन्वर शेख, अमोल सारंग, गुणाजी गावडे, सत्यजित देशमुख, धनश्री मराठे, समीरा खलील, महेश नार्वेकर, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, श्रृतिका दळवी, ॲड. अनिल केसरकर, ॲड. राजू कासकर, अशोक धुरी, देवा टेमकर यांच्यासह अनेक संतप्त ग्राहक उपस्थित होते.
स्मार्ट मिटर ग्राहकांच्या माथी मारता येणार नाही. कायद्याने सक्ती करता येणार नाही. ग्राहकांच्या पुर्व परवानगी नंतर मिटर बदला अशा प्रकारच्या अनेक मागण्या करण्यात आल्या. खाजगी कंपनीच्या भल्यासाठी नको तर ग्राहकांच्या भल्यासाठी काम करा असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
यावेळी निशांत तोरसकर म्हणाले, ग्राहकांनी स्मार्ट मिटरच्या भानगडीत पडू नये, विरोध केल्यानंतर सक्ती करता येणार नाही. त्यामुळे पुढील भरमसाठ बीले येण्यापूर्वी जागृत होवून ग्राहकांनी स्मार्ट मिटर ला विरोध केला पाहिजे.