सावंतवाडी : गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी मालवण-आचरा रस्त्यावर अशीच एक घटना घडली, जिथे एका व्यक्तीने आपली कार पुराच्या पाण्यात घातली आणि ती बंद पडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गाडीतील कुटुंब थोडक्यात बचावले.
ही घटना सकाळी अंदाजे साडे सात वाजता घडली. मालवणमधील आचरा रस्त्यावर पावसाच्या पाण्याने रस्ता पूर्णपणे व्यापला होता. तरीही, एका व्यक्तीने आपली चारचाकी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्यावरच बंद पडली. गाडी बंद पडताच गाडीतील सर्व सदस्य घाबरले, परंतु गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने प्रसंगावधान राखले. त्याने तात्काळ कुटुंबाला गाडीतून बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले.
जवळपास एक तास ही कार पाण्यात अडकून होती. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नदी-नाल्यांजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान विभागाने मुसळधार पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान,जिल्हाधिकारी यांनी उशिरा का होईना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शाळा, माध्यमिक शाळा व अंगणवाड्याना सुट्टी जाहीर केली. अनेक शाळा सकाळी ७.३० वाजता,८ वाजता सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला परिस्थिती नुसार जिल्ह्यातील शाळांना सुट्टी घ्यावी असे निर्देश दिले होते.