सावंतवाडी: महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी आरोप केला आहे की, महायुती सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत आणि विधिमंडळात रमी खेळणे असे निंदनीय प्रकार घडत आहेत. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असून अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले. राज्यात मतदानाचा चुकीचा वापर होत असून सत्ताधारी मंत्रीच जर विधिमंडळात असे प्रकार करत असतील, तर ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे, असेही आंदोलकांनी म्हटले.
या आंदोलनात माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून भ्रष्ट मंत्र्यांच्या कृतीचा निषेध केला.