​सावंतवाडी: मालवण तालुक्यात वसलेलं कोईल हे छोटंसं गाव गेल्या ७०० वर्षांपासून एक अनोखी आणि एकमेवाद्वितीय परंपरा जपून आहे – ‘एक गाव, एक गणपती’. गणेशोत्सवासाठी घराघरात गणपतीची मूर्ती आणण्याऐवजी, इथले प्रत्येक ग्रामस्थ फक्त गावातील गणेश मंदिरात विराजमान असलेल्या गणपतीचीच पूजा करतात. त्यामुळेच हे गाव संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेते आहे.

​मालवणपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर, गडनदी आणि हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावात घरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आढळत नाही. एवढेच नाही तर, लग्नाच्या पत्रिकेवरही गणपतीचे चित्र नसते. जर एखाद्या लग्नपत्रिकेवर गणपतीचा फोटो नसेल, तर ती कोईल गावातून आली आहे, असे समजले जाते. व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या ग्रामस्थांच्या घरातही हीच परंपरा पाळली जाते.

​गावाचं ग्रामदैवत आणि मंदिराची आख्यायिका

​कोईल गावात वरचीवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी आणि चारीवडेवाडी अशा चार वाड्या आहेत आणि या सर्वांचे ग्रामदैवत श्री गणेश आहे. या अनोख्या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी या गावात मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणात होती. एका हिंदू-मुस्लिम युद्धात हिंदू लोक पराभूत होऊ लागले. त्यावेळी त्यांनी आपल्या देवतांच्या मूर्ती जमिनीत पुरून ठेवल्या. कालांतराने, एका व्यक्तीला दृष्टांत झाला, ज्यात देवराईमधील २५ गुंठे जमिनीखाली श्री गणेशाची मूर्ती असल्याचे सांगितले . त्यानुसार, त्या व्यक्तीने खोदकाम केले असता, ही गणेशमूर्ती सापडली. आज हीच मूर्ती गावाच्या मंदिरात विराजमान आहे.

​अनोखी मूर्ती आणि उत्सव:

​मंदिरातील गणेशमूर्ती आसनासहित एकाच पाषाणातून घडलेली असून, तिची उंची ३० इंच आणि रुंदी २१ इंच आहे. तिच्या उजव्या हातात परशू आणि कमळ आहे, तर डाव्या हातात त्रिशूळ आहे. मूर्तीच्या गळ्यात पिंपळाच्या पानांची माळ असून, उजव्या बाजूला एक शिवलिंग आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तीवरील जुनी बेगड बदलली जाते.

​गणेश चतुर्थीच्या काळात गावातील लोक मंदिरात नवसाच्या सत्यनारायणाच्या पूजा करतात. चतुर्थीच्या पहिल्या दिवशी प्रत्येक घरातून नैवेद्य मंदिरात आणला जातो आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप केले जाते. या गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाच्या दिवशी होते, जेव्हा मूर्तीवरील निर्माल्य आणि फुले वाजतगाजत मिरवणुकीने फकीराच्या तळीकडे विसर्जित केली जातात.

​या मंदिराचे सदाशिव रामचंद्र साटम, चंद्रकांत भगवान साटम, तातू रामचंद्र साटम आणि गंगाराम भाऊ साटम हे चार प्रमुख मानकरी आहेत, तर घाडी, देवळी आणि मडवळ हे सेवेकरी म्हणून काम पाहतात. कोईल गावातील लोक मंदिरात गणपतीची पूजा करत असले तरी प्रत्येक घरात गौरीपूजन केले जाते, ही सुद्धा एक विशेष बाब आहे. ​अशा प्रकारे, कोणताही गाजावाजा न करता, कोईल गाव अनेक शतकांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही आपली अनोखी आणि धार्मिक परंपरा जपून आहे.