सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीमध्ये वाढलेल्या अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होत असलेल्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त करत, जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले, ज्यात म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये गांजा, चरस यांसारख्या पारंपरिक पदार्थांबरोबरच एमडीएमए (MDMA), एक्स्टसी (Ecstasy) आणि इतर सिंथेटिक ड्रग्सच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शाळा आणि महाविद्यालयांजवळ या पदार्थांची सहज उपलब्धता हे याचे एक प्रमुख कारण आहे, असे डॉक्टरांनी निवेदनात नमूद केले.
या व्यसनामुळे अनेक तरुण मृत्युमुखी पडले असून, गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात वाढलेल्या आत्महत्यांमागे देखील अंमली पदार्थांचे सेवन हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समाजामध्ये या गंभीर विषयाबद्दल प्रबोधनाचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालून अंमली पदार्थांच्या विक्रीवर आणि सेवनावर कठोर नियंत्रण आणण्याची विनंती केली आहे, जेणेकरून जिल्ह्यातील तरुणांचे भविष्य सुरक्षित राहील.
यावेळी डॉ जयेंद्र परुळेकर,डॉ अमुल पावसकर, डॉ कादंबरी पावसकर,डॉ शंतनु तेंडुलकर, डॉ दत्तात्रय सावंत, डॉ मिलिंद खानोलकर,डॉ नवांगुळ, डॉ खटावकर, डॉ कश्यप देशपांडे तसेच कुडाळ येथील डॉ निगुडकर, डॉ आकेरकर, डॉ सुधीर रेडकर, डॉ पाटणकर, डॉ संजय केसरे, डॉ गुरूराज कुलकर्णी, डॉ मकरंद परूळेकर, डॉ सौ परूळेकर तसेच मालवण येथील डॉ विवेक रेडकर, डॉ लिमये, डॉ सौ लिमये, डॉ सोमवंशी, डॉ व सौ झांटये, डॉ हरीश परूळेकर, डॉ राहुल वझे कणकवली येथील डॉ आंबेरकर, डॉ विद्याधर तायशेटे, डॉ रेवडेकर, डॉ शेळके, डॉ संदीप सावंत, डॉ रासम ,डॉ मुकुंद अंबापुरकर, डॉ रवि जोशी, डॉ व सौ बावधनकर,डॉ पंडीत, डॉ जी टी राणे, डॉ संजय सावंत यासह सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि कणकवली येथील ५५ डॉक्टरांसह जिल्ह्यातील आयएमएचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.