सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महायुतीसाठी जोरदार ‘रस्सीखेच’ सुरू असून, जागावाटपावर एकमत न झाल्यास अनेक ठिकाणी चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
त्रिरंगी आणि दुरंगी लढतीचे चित्र
जर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती झाली नाही, तर सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर कणकवली येथे दुरंगी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. महायुतीचे दोन्ही घटक पक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटण्यास सज्ज असल्याने निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल
या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करताना भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या चार नगराध्यक्ष पदासाठी १७ उमेदवारी अर्ज तर ७७ नगरसेवक पदासाठी २२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक ४ नगराध्यक्ष पदासाठी आज १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे आजपर्यंतच्या उमेदवारांची संख्या १७ झाली आहे. या चारही पालिकेचा ७७ नगरसेवक पदासाठी आज १५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आजपर्यंत २२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सावंतवाडी ७, मालवण ३, वेंगुर्ले ५, कणकवली २ मिळून २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नगरसेवक पदासाठी सावंतवाडी ५६, मालवण ६३, वेंगुर्ले ९१, कणकवली १४ मिळून २२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
भाजप, शिवसेना (शिंदे गट), उध्दव ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे च्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) जोरदार रस्सीखेच आहे.
