सावंतवाडी : गणेश चतुर्थीचा सण अगदी तोंडावर आला असताना, सावंतवाडीत सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गणेशभक्तांची आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र आहे. उद्या, २७ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे बाजारपेठेत आणि गणेश चित्रशाळांमध्ये मोठी लगबग सुरू आहे, पण या पावसाने या उत्साहावर थोडं विरजण घातलं आहे.
गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. भाजीपाला आणि माठीच्या वस्तू विकणारे विक्रेते उघड्यावर बसल्याने या पावसामुळे त्यांची खूप गैरसोय होत आहे. अचानक येणाऱ्या सरींमुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांचीही तारांबळ उडत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी कालपासूनच वाजतगाजत गणेशमूर्ती आणायला सुरुवात केली आहे. अनेक भाविक सोयीनुसार आज आणि उद्या गणेशमूर्ती आपल्या घरी नेत असतात. पावसामुळे मूर्ती सुरक्षित घरी नेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे. काल, सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाऊस पडणार नाही अशी अपेक्षा होती, पण आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने सगळ्यांचीच धांदल उडवली आहे. या पावसामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर थोडं पाणी पडलं असलं, तरी भक्तांचा उत्साह कायम आहे.