सावंतवाडी : वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील सूर्यास्त पॉईंटजवळ दरड कोसळली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारी हि घटना घडली . रस्त्यावर मातीसह मोठे दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, काही वाहनचालकांनी पुढाकार घेऊन दगड बाजूला केले आणि वाहतूक एकेरी सुरू केली.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू केले. दुपारनंतर घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली. गेले काही दिवस सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील या घाटात दरड कोसळण्याची ही घटना घडली. प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना जास्त त्रास झाला नाही.
