सावंतवाडी: सावंतवाडी आणि बांदा या परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार अवकाळी पाऊस झाला. दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. वातावरणात अचानक बदल झाला आणि दिवसाही चांगला अंधार पसरला होता,जसा नेहमीच्या पावसाळ्यात असतो.
या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, या पावसामुळे शेती आणि इतर कामांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फळबागांचे नुकसान
आंबा, काजू, जांभूळ,कोकम अशा फळबागांच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पाऊस कोसळत आहे. आज तर हंगामातील पाऊस कोसळत आहे असे वातावरण तयार झाले होते. आंबा बागायतदारांना शेवटच्या टप्प्यातही पाऊसाने दणादण दणके दिले आहेत. तसेच आंबा विक्रेते देखील पावसामुळे हिरमुसले आहेत.