मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावातील नागरिकांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

सांगलीत परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने सुरक्षिततेबाबत ताबडतोब हालचाली कराव्यात, शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे. तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आभाळ फाटलं… महाराष्ट्रात दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या TOP 10 घडामोडी

एनडीआरएफची टीम दाखल

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खूप आहे. त्यामुळे काठावरच्या गावातील नागरिकांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

अलमाटी धरणातून पाणी सोडले जावे यासाठी चर्चा सुरू

अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. तर, या दोन्ही जिल्ह्यांना असलेला पुराचा धोका टळावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी अलमाटी धरणातून पाणी सोडले जावे यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सांगली, कोल्हापूरला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी अलमाटी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे. असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विद्वारे सांगितलं आहे.