जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आंबा या गावाच्या शिवारातील शेतात विजेच्या धक्क्याने सहा गायी मृत्यूमुखी पडल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुह्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. न्यायालयाने या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील केली आहे.
नेमकं झालं काय?
आंबा गावातील आरोपी शेतकरी लतीफ शेख मकदूम यानं शेतामध्ये विजेच्या तारा लावून ठेवल्या होत्या. प्राण्यांपासून शेतातील पिकांचं संरक्षण व्हावं, यासाठी या तारा त्यानं लावल्याची माहिती मिळाली आहे. या तारांमधून लतीफनं विद्युत प्रवाह सोडला होता. त्याचाच धक्का बसून सहा गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी तातडीने मकदूम याच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती.
देवीच्या मंदिरासाठी गायी सोडण्याची प्रथा
आंबा येथील बागेश्वरी देवीच्या मंदिरासाठी गायी सोडण्याची म्हणजे देण्याची प्रथा या गावात आहे. बागेश्वरी देवीच्या गायींना ग्रामस्थ चारा-पाणी देत असतात. यापैकीच सहा गायींचा विजेच्या धक्क्याने २६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. प्राण्यांशी क्रूर पद्धतीने वागून सहा गायींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, त्याचप्रमाणे भारतीय विद्युत कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.