सावंतवाडी : तालुक्यातील आंबोलीमध्ये आज मॅरेथॉन स्पर्धेसाठी मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेत बेळगाव, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांतून तब्बल सहाशे स्पर्धक सहभागी झाले होते. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन केलं.

आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी केसरकर आणि सावंत यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी स्वागत केले.पावसाच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेची मजा थोडी कमी झाली, अशी चर्चा स्पर्धकांमध्ये होती.

ही स्पर्धा आंबोलीच्या जकातवाडी येथून सुरू झाली. सुरुवातीला ३२ किमी, त्यानंतर १५ किमी, ७ किमी आणि शेवटी ५ किमी धावणाऱ्या लहान स्पर्धकांना झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

या स्पर्धेतील विजेते:३२ किमी: नेत्रा सुतार आणि मलाप्पा,१५ किमी: अविनाश डिचोलकर,०७ किमी: दीप सावंत आणि कु. आयुष राऊळ. ०५ किमी: लाडजी सावंत या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रशस्तिपत्रक आणि मेडल देऊन गौरविण्यात आले.

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. याठिकाणी पाऊस, धबधबे व दाट धुके अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी बोलताना सांगितले.