सावंतवाडी : सावंतवाडी तालुका आणि शहरात सध्या जुने वीज मीटर बदलून त्याऐवजी नवे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. या कामाला स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावेळी, वीज कंपनीने या कामाची जबाबदारी झटकत, अदानी कंपनी थेट हे स्मार्ट मीटर बसवत असल्याचं स्पष्ट केलं.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) सावंतवाडीत जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत आहे. मात्र, हे काम महावितरण थेट करत नसून, अदानी ट्रान्समिशन लि. आणि अदानी एनर्जी सोल्यूशन्स लि. यांच्यामार्फत केलं जात आहे. या कामासाठी अहमदाबाद येथून योजना राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. या कामावर आक्षेप घेत, शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरस्कर यांनी आरोप केला आहे की, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा नोटीस न देताच हे मीटर बसवले जात आहेत. हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वीज वितरण कंपनीने हात झटकले?

आंदोलकांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर, सहायक अभियंता शैलेश राक्षे यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, अदानी कंपनी थेट मीटर बसवत असून, जुने मीटर बदलल्याची कोणतीही नोंद वीज कार्यालयात ठेवली जात नाही. त्यामुळे, वीज कंपनीकडे याबद्दलची माहिती उपलब्ध नाही.निशांत तोरस्कर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर, अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिलं की, हे काम थेट अदानी कंपनी करत आहे.

सरकारकडून स्थगितीचा दावा, पण काम सुरूच:

श्री. तोरस्कर यांनी दावा केला आहे की, त्यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि वीज वितरण विभागाशी संपर्क साधून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला स्थगिती मिळवली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी हे काम सुरूच आहे. त्यामुळे, यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.या आरोपांवर ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, त्यांना अद्याप या कामाला स्थगिती देण्याबाबत कोणताही लेखी आदेश मिळाला नाही, त्यामुळे काम सुरूच आहे.

मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत या प्रकरणी समाधानकारक कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आशिष सुभेदार, देवेंद्र सावंत, समीरा खलील, अँड अनिल केसरकर, शब्बीर मणियार ,प्रवीण गवस, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, मायकल डिसोजा, शैलेश गवंडळकर , अँड राघवेंद्र नार्वेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.