सर्पविष तस्करीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील एकासह गोवा राज्यातील काही जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केल्याने जंगल भागातील शेती वादात अडकली आहे. केरळीय शेतकऱ्यांनी अननसाच्या बागेतून सर्पविष तस्करीची शिकवण स्थानिकांना दिल्याचे बोलले जात आहे. वन्यप्राणी हत्या व सर्पविष तस्करी डोळ्यासमोर येऊनही वनखाते सुस्तावल्यासारखे वागत आहे.
वनखात्याचे अधिकारी बेसुमार वृक्षतोडीला आशीर्वाद देत असल्यानेच वनसंज्ञेखालील डोंगरकपाऱ्याच्या जमिनीतील झाडांची बेसुमार वृक्षतोड झाली आहे. केरळीय शेतकऱ्यांनी बेसुमार वृक्षतोड करून रबर, अननससारख्या बागायती केल्या आहेत.
अननस बागेतून सापांच्या विषाची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात होते. गेली काही वर्षे त्यासाठी पर्यावरणप्रेमींचा पाठपुरावा सुरू होता, पण राज्य शासन व वनखात्याने केरळीयन शेतकऱ्यांना निसर्गसंपन्न सिंधुदुर्गात वृक्षतोड करून शेती करण्यास परवानाच दिला होता. त्यामुळे लोकांची आंदोलने, शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत घोंगडे पडले होते. केरळीय लोकांचे स्थानिक लोक दलाल म्हणूनच काम करू लागले आहेत.
गवारेडा मारून मटण गोवा, केरळ, कर्नाटकात पोहचविणारे एक टोळके वनखात्याला मिळाले होते. वनखात्याने सखोल चौकशी केली असती तर तस्करीचे धागेदोरे उघड झाले असते, पण इंडियन फॉरेस्ट अ‍ॅक्टला जिल्ह्य़ातील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवून  खिसेभरू काम चालविले असल्याने सर्पविष तस्करी करणाऱ्यांना लोणावळा पोलिसांनी अटक केली.
सर्पविष तस्करी करणाऱ्या सहा जणांत साटेली, भेडशी, ता. दोडामार्गमधील एक व चारजण गोवा राज्यातील आहेत. शिवाय यापूर्वी वन्यप्राणी गवारेडा मारून मटण साफ करणारे दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक व केरळीयांना वनखात्याने ताब्यात घेतले होते. यावरूनच वनखात्याची कामगिरी सर्वाना कळून चुकली आहे.