सोलापूरमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करणे आणि नंतर तिचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करत दागिने लुटणाऱ्या नराधमाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच पीडित मुलीस २ लाख रूपये भरपाई देण्याचा आदेशही दिला. शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषीचं नाव गोरखनाथ भीमा राठोड (वय २०, रा. वडगबाळ, ता. दक्षिण सोलापूर) असं आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी या खटल्याचा निकाल दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असून तिचे आई-वडील शेतमजुरी व शेळ्या राखण्याचे काम करतात. २० फेब्रुवारी २०२१ रोजी दोघेही आई-वडील दिवसभर शेतमजुरीसाठी गेले होते. घरात अल्पवयीन मुलगी एकटीच होती. मात्र, आई-वडील सायंकाळी घरी आले तर मुलगी गायब झाली होती. त्यांनी तिचा शोध घेतला असता ती शेतात निपचित पडलेली आढळून आली. शुध्दीवर आल्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

नेमकं काय घडलं होतं?

आरोपी गोरखनाथ याने पीडित मुलीला, तुझ्या आईला भेटायचे आहे. ती शेळ्या चारण्यासाठी कोठे गेली दाखव असे म्हणून तिला मोटार सायकलवर पाठीमागे बसवून नेले. पुढे काही अंतरावर शेतात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून खुन करण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्वांगावर मारहाण करून तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा व पायातील चांदीचे पैंजणही ओरबाडत लुटले.

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल

याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात आरोपी गोरखनाथ विरूध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी २० साक्षीदार तपासले. पीडितेसह तिच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळाचा पंचनामा आदी बाबी ग्राह्य धरण्यात आल्या.

हेही वाचा : धक्कादायक! “तुझ्या विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू” अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

आरोपीला जन्मठेप देत पीडितेला २ लाख रुपयांच्या भरपाईचे आदेश

आरोपीने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केला आणि दागिने लुटून तिच्या खुनाचाही प्रयत्न केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित मुलीला ५ लाख रूपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी केली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप सुनावली. तसेच पीडित मुलीला २ लाख रूपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास दिला. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्रसिंह बायस यांनी बचाव केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur court sentence life imprisonment for rape and attempt to murder of minor pbs
First published on: 21-12-2021 at 20:39 IST